वाई प्रतिनिधी
वाई नगरपालिका येथे आरोग्य विभागात काम करणाऱ्या ठेका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळावा, सानुग्रह अनुदान मिळावे, किमान वेतन मिळावे या मागणीसाठी कामगार आयुक्त यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी आदेश देऊन ही वाई पालिकेने कार्यवाही केली नाही. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि कामगार युनियनचे नेते किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली वाई पालिकेत आरोग्य अधिकारी यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले.
वाई पालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्देशानुसार किमान वेतन दिले जात नाही. कामगार कायद्याचा भंग केला जातो. त्याबाबतची तक्रार कामगार आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती. कामगार आयुक्तांनी वाई पालिकेला सूचित केले होते तरीही कार्यवाही झाली नसल्याने आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि कामगार युनियनच्यावतीने देण्यात आला होता. वाई पालिकेत आरोग्य विभागात केबीन मध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे कर्मचारी, अधिकारी यांची चांगली तारांबळ उडाली. संबंधित कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.