वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यातील तहसील कार्यालय, पालिका प्रशासन जुन्या नोंदी शोधत असून कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी तालुक्यात महसूल व पालिका प्रशासनाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. महसूल विभागाने आतापर्यंत रेकॉर्डवरील ५ लाख ९९ हजार ५५४ नोंदी तपासल्या त्यामध्ये १७०० तर पालिका रेकॉर्डवरील १ लाख ५१ हजार १३२ नोंदी तपासल्या त्यामध्ये केवळ ५८ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्यांच्या इशाऱ्यानंतर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधिशांच्या अधिपत्या खाली राज्यातील समिती स्थापन केली. या समितीच्या सुचनेनुसार शासनाने दि. ७ सप्टेंबर तसेच ३ नोव्हेंबर २३ रोजी पुरातन मोडी किंवा मराठी हस्ताक्षरात कुणबी अथवा मराठा कुणबी अशा प्रकारच्या नोंदी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका असलेल्या नागरिकांच्या जन्म आणी मृत्यूच्या नोंदी मध्ये कुणबी मराठा अथवा मराठा कुणबी अशा जातीचा उल्लेख आढळून येत आहे का? याची अधीकृत माहिती घेण्या साठी एक समिती नेमली आहे. नागरिकांच्या जन्म अथवा मृत्यूच्या रजिस्टर मध्ये आढळून येतात का ? त्याच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाई तालुक्यात नोंदी तपासणीचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. या कामासाठी तहसील कार्यालयात आणि वाई नगरपरिषद कार्यालयात तसेच स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून व २२ कर्मचारी यांनी महसुली अभिलेखातील मराठीतील २१,९००, जन्म मृत्यू रजिस्टर मधील ८२,९१० आणि सह जिल्हा मुद्रांक निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील २५,२९१ नोंदी तपासल्या. शिक्षण विभागाने शैक्षणिक अभिलेखातील ४,९६,५५३ नोंदी तपासल्या. त्यामध्ये कुणबी जातीच्या १७०० नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. मोडी लिपीच्या नोंदीची तपासणी करण्यासाठी कांचन कोठावळे यांच्यासह तीन मोडी वाचकांची नेमणूक केली असून त्याचे कामकाज सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.