
प्रणाली कदम / सातारा प्रतिनिधी
“आयुष्य है चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे” हे गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच, खरंच या गाण्यात आयुष्याचा खरा अर्थ दडलेला आहे. या गाण्यातील शब्द आपल्या आयुष्याशी किती जवळचे आहेत. खरोखरच कांदेपोहे करताना ज्याप्रकारे त्याला फोडणी देऊन, परतून चव आणली जाते, त्याचप्रमाणे आपले आयुष्यही आहे ! आपल्या आयुष्यातही विविध प्रकारच्या परीक्षारूपी फोडण्यांमधून, मार्करूपी परतून आपल्याला जावे लागते. या फोडण्या फक्त परीक्षा, मार्कांच्या पुरत्याच मर्यादित असतात, असं नाही. त्या सुख दुःखांच्या असतात. विविध प्रकारच्या अनुभवांच्या असतात. खेळ खेळणारा तर वर बसला आहे, पण सोंगट्या तर आपल्याच हातात आहेत! आपल्याला आयुष्याची खरी चव तेव्हाच कळते जेव्हा आपण पोह्यांसारखेच कढईमध्ये परतले जातो. मग असे कांदेपोहेच चविष्ट लागतात.
मित्रांनो! आपलं आयुष्य ही किती व्यापक कल्पना आहे, याचा विचार केलाय का? नसेल तर करा. जीवन हे दोन प्रकारे जगता येतं एक म्हणजे अर्थपूर्ण आणि दुसरे म्हणजे अर्थ नसलेलं निरर्थक जगणे. मित्रांनो हे आयुष्य म्हणजे आपल्याला मिळालेली एक खूप मोठी देणगी, एक मोठ दान आहे. ते असं तसं कधी वाया नाही घालवायचं ! त्याला अर्थपूर्ण बनवायचं ! आणि स्वतःही अर्थपूर्ण होऊन जगायचं.
प्रत्येकाच्या वाट्याला सारखंच नशीब येईल, असं नाही. आपल्यालाच ते कमवावं लागतं.
आपण ज्या पध्दतीने विचार करु, कृती करु, त्याप्रमाणे ते वळणे घेत असते. आपलं आयुष्य बहारदार बनवणं, चांगलं बनवणं आता आपल्याच हातात आहे !
आपल्या आयुष्यात आपलं एखादं ध्येय असलं पाहिजे, त्यावर आपलं जीवापाड प्रेमही असलं पाहिजे. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीच आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. त्या ध्येयालाही काहीतरी अर्थ असला पाहिजे. वजन असलं पाहिजे. शाळेतल्या परीक्षा, विविध स्पर्धा, वेगवेगळ्या एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा भरपूर अभ्यास हा त्याचाच पाया समजून कार्यरत रहायचं असतं आपलं आयुष्य हे त्याच्या सरळ रेषेप्रमाणे कधीच नसतं. त्यात अनेक चढ-उतार असतात. ते कोणालाच चुकत नसतात. आपल्याला सुखानंतर दुःख येतच असतं. आणि त्याला आपल्याला सामोरं जावंच लागतं.
“जीवनाच्या वाटेत, दुःखाच्या काट्यांवर सुखाच्या फुलांवर, दिव्याच्या उजेडावर चालत तर रहावं लागतं. आनंदाने कधीतरी सुखाचा क्षण येतो कधी जीवन ओसाड वाटते, परंतु यात जो आनंद मिळतो तोच या जगात जीवनात यशस्वी होतो.” असं म्हणतात की, माणसाचा जन्म हा एकदाच मिळतो. आपल्याला जेवढा तो चांगल्या पध्दतीनं जगता येईल. तेवढा प्रयत्न करायचा !
आपल्याला आयुष्यात अनेक अनुभव येतात, त्यातूनच आपण शिकत असतो. मित्रही आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही घटनेकडे वैचारिक नजरेने पहायला शिकले पाहिजे. कधीही बोलताना दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. नाती जपणं हे फार महत्त्वाचं असतं. नाती तोडायला काही सेकंद पुरेसे असतात. पण तीच नाती जोडायला फार काळ लागतो. तोडणं सोपं तर जोडणं हे अवघड ‘असतं! आपल्या मध्ये सुखदुःखाची रांग चालूच असते. आपणच आपल्या दुःखात एखादा क्षण सुखाचा, आनंदाचा शोधायचा असतो. अजून एक जर आपल्याला चारचौघांत काही किंमत नसेल, आपल्या जवळ प्रयत्न करायचं सामर्थ्य नसेल, दुसऱ्याला समजून घेता येत नसेल, आपला उपयोग दुसऱ्याच्या चांगल्यासाठी होत नसेल, तर अशा जगण्याला काय अर्थ आहे ? आपण काहीच न करता ‘मला चांगलं आयुष्य मिळो असं देवाकडे म्हणून काही उपयोग नसतो. अशा वेळी देवसुध्दा , म्हणतो, ‘आधी प्रयत्न कर !’ आपल्याला जर आयुष्यामध्ये दुसऱ्याला सुखी करता आलं तरच तो मनुष्य स्वतः सुखी राहू शकतो.
जीवन हे एखाद्या फुलाप्रमाणे असते. फुलाला जास्त कुरवाळले की ते कोमेजून जाते. त्याचा गंध उडून जातो, त्याच्या पाकळ्या गळून जातात. त्यामुळे त्या फुलाला झाडाच्या फांदीवरच त्याच्या जगण्याचा आनंद घेऊ द्यावा आणि त्या फुलाच्या फुलण्याचा आपणही दुरूनच आनंद घ्यावा. प्रत्येक व्यक्तीलाही त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्यातच खरा आनंद वाटतो. कोणत्याही माणसाला कोणाच्याही बंधनात रहावे असे वाटत नाही. प्रत्येकालाच प्रत्येकाचे वेगळे असे एक आयुष्य असते. त्या आयुष्यात तो माणूस किती वर्षे जगला याला काहीच महत्त्व नसते; तर तो ते जीवन कशाप्रकारे जगला यालाच जास्त महत्त्व असते.
माणसाने जीवनात काय करावे ? तर ज्याला त्याला आपल्या जीवनात उपलब्ध होतील त्या गोष्टींमध्ये अधिक आनंदी व सुखी रहावे. जो ऑक्सिजन बंगल्यात मिळतो तोच ऑक्सिजन झोपडीतही मिळतो. म्हणून माणसाने प्रयत्नाने काही प्राप्त करूच नये असे नाही. जीवनात संकटे, वाईट क्षण, सुख-दु:खांचे प्रसंग हे येणारच. पण त्यामुळे खचून न जाता त्या प्रसंगांना प्रतिकार करण्यात जो पुरूषार्थ आहे, तोच माणसाच्या जीवनातला परमोच्च सुखाचा क्षण होय. अशा प्रकारचे धाडस करणारी व्यक्ती समाजाच्या कौतुकास पात्र ठरते. माझे जीवन म्हणजे ‘खूप साऱ्या अडथळ्यांचा प्रवास आहे’ असे प्रत्येकालाच वाटत असते. हे सारे माझ्याच नशीबाला का यावे ? असाही प्रश्न प्रत्येकाला पडतोच. तेव्हा आपण मनाशी हा विचार करायला हवा की इतक्या मोठ्या संकटाचा मुकाबला करण्याची पात्रता फक्त माझ्याच अंगी आहे. पुढे संकटे कमी होत जातील आणि आपले जीवन आनंदाच्या बागांनी फुलत जाईल.
इतर पशु-पक्षांशी तुलना केल्यास माणसाचे आयुष्य खूप सुंदर आहे. आणि हे आयुष्य आपल्याला लाभले कारण आपण भाग्यवान आहोत, असाच विचार प्रत्येकाने करायला हवा. त्यासाठी आपल्या जीवनाची सुंदरता आपण कशी वाढवाल ? शेतात कष्ट करताना घामाच्या धारांनी निथळणारा शेतकरी संध्याकाळची पोटपूजा करून सुखाची गाढ झोप घेतोच ना ? अगदी त्याचप्रमाणे आपण दु:खांवर मात करून पुढे जायला हवे. प्रत्येक उगवत्या दिवसाला आपण नव्याने सामोरे जाऊ शकतो.
मला वाटते सुखाचे असंख्य झरे परमेश्वराने माणसाच्या पावला-पावलांवर पेरून ठेवले आहेत. त्यांचा शोध घेण्याची दृष्टी मात्र प्रत्येकाला हवी. दररोजच्या व्यापातून माणसाला खूप काही करता येईल. पहाटे गावाबाहेर फिरायला जाऊन व्यायामाबरोबरच उगवतीचे रंग पहा. ते हृश्य तुम्हाला भूतकाळ विसरायला लावेल. घरात एकटे असताना आपल्याच मनाशी आवडत्या गाण्याची ओळ गात रहा. पहा, तुमचा ताण कुठल्या कुठे पळून जाईल. कधी तरी आवडत्या कलाकाराचा चित्रपट पाहणे, मित्रांसोबत चार” सहा महिन्यातून एकदा एखाद्या गडकोटाची भ्रमंती करणे, एखादे चांगले व्याख्यान ऐकणे, दूरदर्शनवरील एखाद्या विनोदी कार्यक्रमात रमून जाणे, रात्री झोपताना एखाद्या सुंदर पुस्तकातील काही उतारे वाचणे, आपल्या आवडत्या रंगाची छान-छान कपडे वापरणे. घराभोवतीच्या बागेत बागकाम करताना रोपांशी संवाद साधणे असे अनेक आनंदाचे झरे आपल्याला ठाऊकच नसतात.
कदाचित माझ्यापेक्षा आनंदाच्या तुमच्या कल्पना वेगळ्या असतील. कोणाला मावळत्या सूर्याकडे पाहत नदीकिनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून बसायला आवडेल किंवा सांजवेळेला पद्मासनात बसून देवघराच्या एकांतात ध्यान कगयला आवडेल. कोणाला चित्रकलेचा तर कोणाला छायाचित्रणाचाही छंद असू शकतो. दु:खितांचे अश्रू पुसण्याचा वेडा छंदही तुम्हाला आनंदाचा ठेवा देऊ शकतो.
शेवटी काय ? तर प्रत्येकाने हाच विचार करायला हवा की मनुष्य जगतो कशासाठी ? खूप पैसा मिळविण्यासाठी, खूप श्रीमंत होण्यासाठी, खूप मोठ्या प्रतिष्ठेसाठी की आणखी काही. लक्षात असू द्या माणूस जगतो केवळ आनंद प्राप्तीसाठी आणि हा आनंद कोठे मिळेल ? तो देवपूजेत मिळेल, तो कष्टात मिळेल, तो आठवड्याच्या बाजारात ओली भेळ खाताना सुद्धा मिळेल. इतरांना मदत करतानाही मिळेल. आणि हो ! तो आनंद देशाची सेवा करताना तर मिळेलच मिळेल.
मंगेश पाडगावकर म्हणतातच ना ‘सांगा, कसं जगायचं, कण्हत कण्हत, की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा.’
“आयुष्याच्या महत्वाच्या क्षणी
नवीन काही शिकायचं असतं,
नवीन काही शिकत असताना
जुनं दुःख विसरायचं असतं,
जुनं दुःख विसरूनच सुखाचा
टप्पा गाठायचा असतो.
तेव्हा कोणतीही गोष्ट करताना विचार करा. आपलं एक ध्येय ठरवा आणि त्यासाठीच कायम प्रयत्नशील रहा. समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचा प्रयत्न करा, कितीही संकटे आली. खडडे आले, तरी दुःखी न होता, न खचता, त्यातच आनंद शोधायचा प्रयत्न करा, This life is big race… जर यात टिकायच असेल, तर आपल्याला Strong असलंच पाहिजे. So, what do you think? बघा, जरासं माझ पटलं तर !
Friends ekbar heley,
Mudke na aayegi ye jindagi jeley!!
Think hatke.
आपला दृष्टीकोन चांगला आहे परंतू जी माणसे श्रीमंत आहेत त्यांनाच याजगात राहणारी माणसे किंमत देतात .मग त्यांनी कुठल्या ही मार्गाने पैसा कमावलेला असो.त्यांनाच लोक भाव देतात व जिवनात प्रगती केली असे म्हणतात.सरळमार्गी प्रामाणिक लोक श्रीमंत होत नाहीत व लोक त्यांना बेआकाल समजतात.त्यांना वेडा आहे असे समजतात.